Breaking

अंबाजोगाई बसस्थानकात दोन महिलांचा थरार; ‘भानामती’च्या अघोरी प्रकाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Updated: मार्च 17, 2026

By Vivek Sindhu

भानामती'च्या अघोरी प्रकाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई येथील मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी पहाटे दोन मनोरुग्ण महिलांनी धुमाकूळ घालत ‘भानामती’ सदृश्य अघोरी प्रकार केल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. सकाळी ६ ते ७ च्या सुमारास या महिलांनी एकमेकींना हाणामारी करण्यासह धावत्या बसेस अडवून चालकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि बसेससमोर लिंबू कापून विचित्र हातवारे केले. या धक्कादायक घटनेमुळे बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असून आगार प्रशासनाने आता पोलीस बंदोबस्ताची तातडीने मागणी केली आहे.
गजबजलेल्या बसस्थानकात हा सर्व प्रकार घडत असताना तिथे ना एसटीचे सुरक्षा रक्षक हजर होते ना पोलीस कर्मचारी. या महिलांनी थेट बसेसच्या समोर उभे राहून अडथळा निर्माण केला. त्यांनी केलेल्या अघोरी कृत्यांमुळे करणी-बाधेची भीती वाटून अनेक प्रवाशांनी बसमध्ये चढण्यासही धास्ती घेतली होती. हा सर्व थरार बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक प्रवाशांच्या मते, अंबाजोगाई बसस्थानकात गेल्या काही दिवसांपासून मनोरुग्ण आणि गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वर्दीतील पोलीस कर्मचारी तैनात नसल्याने अशा लोकांचे फावत असून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अशा व्यक्तींकडून प्रवाशांवर शारीरिक हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत अंबाजोगाईचे आगार प्रमुख यांनी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. बसस्थानकात फिरणाऱ्या अशा संशयास्पद आणि मनोरुग्ण व्यक्तींचा तातडीने बंदोबस्त करावा, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षा अबाधित राहील आणि महामंडळाच्या कामात अडथळा येणार नाही, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.