Breaking

परळीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मकोकातील फरार आरोपीसह दोन अट्टल साखळी चोर जेरबंद

Updated: मार्च 31, 2026

By Vivek Sindhu

मकोकातील फरार आरोपीसह दोन अट्टल साखळी चोर जेरबंद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने परळी येथील इराणी वस्तीमध्ये धाडसी कोम्बिंग ऑपरेशन राबवून दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ठाणे जिल्ह्यातील ‘मकोका’ (मोक्का) कायद्यांतर्गत फरार असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराचा समावेश आहे. या यशस्वी कारवाईत पोलिसांनी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, यामुळे जिल्ह्यातील साखळी चोरीचे तीन प्रमुख गुन्हे उघडकीस आले आहेत.

धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या साखळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे आरोपी परळीतील इराणी वस्तीत वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करून २८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास तीन पथकांनी इराणी वस्तीत छापा टाकला. रात्रभर पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी कंबर ऊर्फ डंबर शहाजहान इराणी आणि हसनैन बरकतअली मिर्झा बेग ऊर्फ इराणी या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी धारूर, आष्टी आणि बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपी हसनैन बेग हा ठाणे जिल्ह्यातील एका गंभीर मकोका गुन्ह्यात पोलिसांना हवा होता, अशी माहिती समोर आली आहे. या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी धारूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मोहिमेत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, धनंजय ढोणे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.


Categories

Recent Posts