छत्रपती संभाजीनगर : देशभरात खळबळ उडवणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर फसवणूक प्रकरणात शहरातील दोन अभियंते सहभागी असल्याचे उघड झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. तामिळनाडू पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरातील देवळाई परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून हे दोघे संशयित ताब्यात घेतले.
तामिळनाडू पोलिसांची कारवाई, हॉटेलमध्ये बसवला होता बनावट पोलिस दालनाचा सेटअप
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे श्रीकांत सुरेशराव गाडेकर (३४, रा. वडगाव कोल्हाटी) आणि नरेश कल्याणराव शिंदे (२६, रा. आर्यन सिटी, वाळूज) अशी आहेत. हे दोघे अभियंते असून अनेक दिवसांपासून हॉटेलमध्ये थांबत बनावट पोलिस अधिकारी म्हणून लोकांची फसवणूक करत होते.
तामिळनाडूमधील तिरूवनचेरी येथील प्रभाकरन कुंधू चंद्रन रुवी यांना ‘दिल्ली सायबर पोलिस’ असल्याचे भासवत आरोपींनी कॉल केला. त्यांच्या बँक खात्यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे सांगत ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये अडकवून तब्बल २ कोटी २७ लाख २४ हजार ९०० रुपये उकळले.
या प्रकरणाचा तपास करताना तांत्रिक माहितीच्या आधारे तामिळनाडू पोलिस छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. २९ जुलै रोजी पोलिस निरीक्षक व्ही. के. सशिकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी देवळाई परिसरातील हॉटेलमध्ये छापा टाकून दोन्ही संशयितांना अटक केली. तामिळनाडू सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सातारा पोलिस ठाण्यात नोंद केल्यानंतर पुढील कारवाईसाठी रवाना झाले.
या आरोपींकडून पोलिसांची वेषभूषा, बनावट दालनाचा सेटअप तयार करून व्हिडिओ कॉलद्वारे लोकांना विश्वासात घेऊन फसवणूक केली जात होती. हे दोघे एका मोठ्या सायबर गुन्हेगारी रॅकेटचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शहरातील दोन तरुण अशा प्रकारच्या देशपातळीवरील गुन्ह्यात सामील असल्याचे स्पष्ट झाल्याने संपूर्ण पोलिस यंत्रणा चक्रावून गेली आहे. डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा हा थरकाप उडवणारा प्रकार पुन्हा एकदा नागरिकांनी सायबर सुरक्षेच्या बाबतीत जागरूक राहण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.