Breaking

बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस

Updated: एप्रिल 1, 2026

By Vivek Sindhu

बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका विधीसंघर्ष बालकाबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित बालकाच्या राहत्या घरी शोध घेतला असता तो मिळून आला आणि त्याच्या ताब्यातून चोरीच्या तब्बल तीन दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशी दरम्यान, या विधीसंघर्ष बालकाने परळी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून या तीनही मोटार सायकली चोरल्याची कबुली दिली आहे. जप्त केलेल्या वाहनांमध्ये एक स्कुटी आणि दोन मोटार सायकलींचा समावेश असून हा सर्व मुद्देमाल पुढील तपासासाठी परळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईमुळे परळी शहर पोलीस ठाण्यातील गु.र.नं. १८/२०२६ आणि संभाजीनगर पोलीस ठाण्यातील गु.र.नं ६९/२०२६ असे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अंतर्गत दाखल असलेले दोन महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही महत्त्वपूर्ण कामगिरी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे, विष्णू सानप, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.


Categories

Recent Posts