Breaking
Updated: सप्टेंबर 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधाराशिव : येथील गणेशनगर परिसरातील कृष्णा कोरे यांच्या खून प्रकरणाचा निकाल अखेर लागला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांनी १८ सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालात तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच प्रत्येकी ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, दंड न भरल्यास ११ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे तन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील आहेत.
ही घटना नोव्हेंबर २०२१ मध्ये घडली होती. कृष्णा कोरे बेपत्ता असल्याची तक्रार वडील शिवशंकर कोरे यांनी ढोकी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर गडदेवधरी शिवारात नग्न अवस्थेतील मृतदेह सापडला. डीएनए तपासात तो मृतदेह कृष्णा कोरे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान पोलिसांना कृष्णाच्या मोबाईलवरून शिंगोली येथील हॉटेल मेघदूतमध्ये ऑनलाइन व्यवहार झाल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर रमेश भगवान मुंडे, अमोल अशोक मुंडे (दोघे रा. कोयाळा, ता. धारूर) आणि शिवशंकर हरिभाऊ इंगळे (रा. इंगळेवस्ती, ता. केज) हे आरोपी असल्याचे समोर आले. आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर कृष्णाने नकार दिला. त्यामुळे त्याला लोखंडी रॉडने मारहाण करून हात बांधले. मोबाईलवरून २१०० रुपये हॉटेलमध्ये आणि ३५०० रुपये एका रिक्षाचालकाला ट्रान्सफर केले. त्यानंतर गळा दाबून व रॉडने मारहाण करून कृष्णाचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे कपडे काढून मृतदेह तिथेच टाकून दिला.
पाेनि. दराडे, चिंतले, पारेकर आणि बांगर यांनी या प्रकरणाचा तपास केला. जिल्हा सरकारी वकील महेंद्र बी. देशमुख यांनी न्यायालयात २७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सादर केलेल्या पुराव्यांनंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले.