परळी : काम देण्याचे आमिष दाखवून एका तृतीयपंथीयाने परप्रांतीय 20 वर्षीय तरुणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केले आणि तिघांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना परळी तालुक्यातील अस्वलआंबा शिवारात शनिवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी तृतीयपंथीयासह चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
परळी तालुक्यातील खळबळजनक घटना; चौघांवर गुन्हा
या घटनेतील पीडिता मुळची हैद्राबाद येथील असून, मुंबईत घरगुती साफसफाईच्या कामावर होती. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती मुंबईहून हैद्राबादला जाण्यासाठी रेल्वेने निघाली होती. भूक लागल्याने ती परळीत उतरून एका हॉटेलमध्ये जेवत असताना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची नजर तिच्यावर पडली. पूजाने बोलत बोलत तिची गरज जाणून घेतली आणि काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर पूजाने सतीश अण्णासाहेब मुंडे (रा. डाबी, ता. परळी) आणि मोहसीन सरदार पठाण (रा. शिवाजीनगर, परळी) या दोघा साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर ते तिघे पिडीतेला मोटारसायकलवर बसवून अस्वलआंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या साथीदाराकडे घेऊन गेले. तिथे एका मंदिराशेजारी असलेल्या भागवत कांदे याच्या मालकीच्या खोलीमध्ये नेऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत मारहाण करत तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याकामी पूजाने त्यांना मदत केली. सदर फिर्यादीवरून चारही आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे करत आहेत.
डायल ११२ ला कॉल आल्याने घटना उघड
दरम्यान, गावात सुरु असलेल्या या घृणास्पद प्रकाराची माहिती एका सजग नागरिकाने शनिवारी पहाटे डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना दिली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत परळी ग्रामीण ठाण्याचे सहा. फौजदार टोले यांनी अस्वलआंबा गाठले आणि पिडीतेची सुटका केली. यावेळी पोलिसांना पाहताच पूजाने घटनास्थळाहून पळ काढला. मात्र सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.