Breaking

‘डिजिटल अरेस्ट’ करून २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या तिघांना जळगावमधून अटक

Updated: एप्रिल 2, 2026

By Vivek Sindhu

Picsart 26 04 02 21 38 21 357 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

परळी: येथील एका नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल २३ लाख ४२ हजार ८८८ रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा बीड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. परळी येथील रहिवासी सूर्यकांत निवृत्तीराव मुंडे यांना बनावट पोलीस बनून डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवण्यात आले होते. याप्रकरणी सायबर पोलिसांनी जळगाव येथून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि बँक खात्यातील रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. 

तक्रारदार मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बीड सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास चक्र फिरवले होते. तपासादरम्यान या गुन्ह्याचे धागेदोरे जळगावमध्ये असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तातडीने पथक रवाना करून प्रसन्न अजय कासट, स्वाती प्रसन्न कासट आणि संकेत दीपक बेलदार या तिघांना ताब्यात घेतले. हे आरोपी करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे पैसे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खात्यावर वळवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ३ लाख रुपये रोख जप्त केले असून त्यांच्या बँक खात्यावरील ३ लाख २० हजार रुपयांची रक्कम गोठवली आहे. 

बीड सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यात अजून कोणाचा सहभाग आहे किंवा त्यांनी इतर किती लोकांची फसवणूक केली आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.


Categories

Recent Posts