Breaking
Updated: जानेवारी 16, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी जिल्हा प्रशासनाने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून, येत्या १९ जानेवारी २०२६ पासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केले असून, संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी आणि पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील विविध गावांमधील आरक्षण प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर आता रिक्त पदे भरण्याच्या हालचालींना वेग आला असून, २ मार्च २०२६ रोजी या भरतीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
या भरती प्रक्रियेच्या नियोजित वेळापत्रकानुसार, १९ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच दिवसापासून ३० जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज सादर करता येतील. अर्जांची छाननी करणे आणि पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र वाटपाचे काम २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान पूर्ण केले जाणार आहे. पोलीस पाटील पदासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली लेखी परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार असून, अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच २४ फेब्रुवारीला या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला जाईल.
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या तोंडी परीक्षा अर्थात मुलाखती २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेतल्या जातील आणि त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. संपूर्ण प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून २ मार्च २०२६ रोजी भरतीचा अंतिम निकाल घोषित केला जाणार आहे. ही भरती प्रक्रिया राबवताना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ आणि संबंधित शासन निर्णयांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश बीड, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई आणि परळी या उपविभागांतील सर्व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे की, भरती प्रक्रिया राबविताना न्यायालयीन आदेश, शासन सूचना आणि वेळोवेळी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही याची विशेष दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. या पदभरतीमुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेच्या कामात मोठी मदत होणार असून रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.