अंबाजोगाई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने जाहीर केलेल्या नवीन प्रभाग रचनेमुळे इच्छुक उमेदवारांच्या समीकरणात मोठी उलथापालथ झाली आहे. सोमवारी (दि. १८) नगर परिषद प्रशासनाने शहराचे १५ प्रभागांमध्ये विभाजन जाहीर केले असून, एकूण ३१ सदस्य निवडले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवीन रचनेनुसार १४ प्रभाग हे द्विसदस्यीय, तर एक प्रभाग त्रिसदस्यीय ठरवण्यात आला आहे. त्यामुळे १४ प्रभागांतून २८ आणि एका प्रभागातून ३ असे मिळून ३१ नगरसेवक निवडले जातील.
प्रभाग बदलामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड
गेल्या चार वर्षांपासून नगरसेवक होण्यासाठी तयारी करणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले लक्ष विशिष्ट प्रभागांवर केंद्रित केले होते. त्यांनी आपल्या प्रभागात जनसंपर्क, सामाजिक कार्यक्रम, आर्थिक खर्च अशा पद्धतीने राजकीय पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नवीन प्रभाग रचनेमुळे अनेक भाग एकमेकांत विलीन किंवा वेगळे करण्यात आल्याने काहींचे राजकीय गणित बिघडले आहे. दीर्घकाळाचा परिश्रम वाया गेल्याने काही इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचनेवरून शहरात आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. काहींनी प्रशासनावर हेतुपुरस्सर बदल केल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी यामध्ये सत्ताधारी गटाचा हस्तक्षेप असल्याचे सूचित केले आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाने मात्र ही रचना पूर्णपणे कायदेशीर निकषांनुसार आणि लोकसंख्या व भौगोलिक स्थिती लक्षात घेऊनच केल्याचे स्पष्ट केले आहे.
काहींसाठी नवीन संधी, काहींसाठी धक्का
लोकसंख्येच्या कमीअधिक घनतेमुळे प्रभागांचे आकार लहानमोठे झाले आहेत. ज्या इच्छुकांचा प्रभाग मोठा आणि व्यापक झाला आहे, त्यांची मतदारांशी संपर्क साधताना कसरत होणाराहे. काही इच्छुकांसाठी ही रचना सोयीची ठरत असून त्यांना अपेक्षित असे एकगठ्ठा मतदान नवीन रचनेनुसार एकतर आल्याने निवडणूक सोपी झाल्याची भावना त्यांच्यात आहे. मात्र ज्या प्रभागांचे क्षेत्रफळ बदलून ते दुसऱ्या प्रभागात गेले आहेत, त्या इच्छुकांची पुन्हा जनसंपर्काची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या शहरात “कही ख़ुशी, कही गम” असे चित्र दिसत आहे.
राजकीय रंगत वाढली
या बदलांमुळे शहरातील राजकीय वातावरण रंगू लागले आहे. विविध पक्षांचे स्थानिक नेते आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बदललेल्या प्रभाग रचनेनुसार उमेदवार निवडीचे गणित मांडू लागले आहेत. काही प्रभागांत इच्छुकांची संख्या दुप्पट झाली असून, आतापर्यंत एकहाती मानले जाणारे प्रभाग आता बहुरंगी लढतीकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे यावेळेस नगर परिषदेच्या सभागृहात अनेक नवीन चेहरे दिसतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सूचना व हरकतींसाठी मुदत
नगर परिषदेने या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिक मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात आपली मते नोंदवू शकतात. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे.