घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर व अहमदपूर येथील अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन रात्री गस्त व नाकाबंदी आदेश देण्यात आले होते. यामध्ये नागरिकांनाही सहभागी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
रविवारी पहाटे औसा व भादा पोलिस गस्त घालत असताना नागरिकांकडून माहिती मिळाली की, औसा-तुळजापूर महामार्गावर शिवलीमोड आणि सिंधाळा परिसरात एक संशयास्पद चारचाकी वाहन फिरत आहे. पोलिसांनी तत्काळ त्या वाहनाचा पाठलाग करत ते शिवलीमोड येथे अडवले. त्यामधील आठ जणांपैकी पाचजणांना ताब्यात घेण्यात यश आले, तर तिघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
रिहान मुस्तफा शेख (वय २०), अन्वरखॉ जलालखॉ पठाण (२४), हफिज मुमताजोददीन शेख (३६) तिघेही रा. परळी, जि. बीड, सादेक मोहम्म्द यासिन मोहम्मद (४४) आणि फारुख नबी शेख (२७) दोघेही रा. बीड अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या टोळीकडून टेम्पो (एम.एच. ४४ यू. ३२९८) मधून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, कोयते, धारदार चाकू, लोखंडी दांडके, कटावण्या, रॉड, पाईप, बनावट नंबर प्लेट, चार मोबाईल फोन आणि टेम्पो असा एकूण ७ लाख ७१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर लातूर जिल्हासह शेजारील जिल्हे व राज्यात गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि महावीर जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या कारवाईत पोनि. सुनील रेजितवाड, सपोनि. महावीर जाधव, पोउपनि. भाऊसाहेब माळवदकर, रामकिशन गुट्टे, हानमंत पडिले, मौला बेग, दत्तात्रय तुमकुटे, योगेश भंडे, सचिन गुंड, भागवत गोमारे, सूर्यकांत मगर, प्रकाश राठोड, संदीप राठोड यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुधाकर बावकर यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि औसा डीवायएसपी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.