Breaking
Updated: July 20, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupरेणापूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील ‘पन्नगेश्र्वर साखर कारखाना’ तीन वर्षाच्या खंडानंतर अखेर यावर्षी सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा कारखान्याच्या नवीन प्रशासनाने केली आहे. नोंदणी केलेला ऊस गाळपासाठी घेण्यात येणार असल्याने पंचक्रोशीतील उस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उसाची नोंदणी करून घावी असेही आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे. पन्नगेश्र्वर कारखाना सुरु होत असल्याने रेणापूर, लातूर, अहमदपूर, चाकूर, परळी, अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.
लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या हिताची दूरदृष्टी ठेऊन पन्नगेश्र्वर कारखाना सुरू केला होता. यावर्षी विमल ॲग्रो यांच्याकडे हा कारखाना आल्यानंतर नवीन प्रशासनाने यंदाच्या हंगामात कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली करत यंत्रसामुग्रीच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे. सध्या कारखान्यातील यंत्रसामुग्रीची दुरुस्ती अंतिम टप्प्यात असून, लवकरच कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. त्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार यंदाचा गाळप हंगाम सुरू केला जाणार आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन
पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा कारखाना पुन्हा सुरू होत आहे. गाळपाच्या नियोजनासाठी कारखाना प्रशासन पूर्ण सज्ज असून स्थानिक शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्य देण्यात येणार आहे. चालू वर्षी कारखाना प्रशासन नोंदणी केलेल्या तारखेला प्राधान्य देणार असून नोंदीनुसार क्रमवारीने गाळपासाठी ऊस स्वीकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शेतकी विभाग तत्पर आहे. साखर कारखान्याच्या पंचक्रोशीतील उसाच्या नोंदणीस प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड झालेल्या उसाची नोंद आपल्या परिसरातील शेतकी विभागाच्या कर्मचाऱ्याकडे तत्परतेने करावी असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य
“लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा कारखाना सुरू केला. त्यांचाच आदर्श घेऊन स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उसाची नोंद करून घ्यावी”
– अक्षय मुंदडा
अध्यक्ष, पन्नगेश्र्वर साखर कारखाना