Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

‘आठवण गावाकडची’ उपक्रमाने बाल निकेतन सेमी इंग्लिश स्कूलमध्ये दाटला मातीचा सुगंध!

Updated: फेब्रुवारी 12, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 02 12 at 8.23.50 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

प्रत्येकाच्या डोळ्यांत तरळल्या बालपणीच्या स्मृती

अंबाजोगाई: शहराच्या धावपळीच्या आयुष्यात हरवलेलं आपलं गाव… मातीचा सुगंध, चुलीवरच्या भाकरीचा वास, आजीच्या ओव्या, अंगणातली खेळणी, बैलगाडीचा आवाज.. हे सगळं फक्त आठवणीतच उरलंय असं वाटत असतानाच येथील ॲड. जयसिंग चव्हाण संचलित बालनिकेतन सेमी इंग्लिश स्कूल आणि जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालयाने शाळेत ‘आठवण गावकडची’ हा आगळावेगळा उपक्रम राबवला आणि क्षणातच संपूर्ण शाळा जणू आपल्या जुन्या खेड्यात परावर्तीत झाली.

WhatsApp Image 2026 02 12 at 8.23.49 PM

शाळेच्या परिसरात पाऊल टाकताच मातीचा दरवळ जाणवत होता. एका बाजूला चुल पेटलेली, दुसरीकडे जात्यावर दळण दळणाऱ्या विद्यार्थिनी, कुणी उखळ-मुसळात कांडण करत होते, तर कुणी पारंपरिक खेळ खेळत होते. ओव्या, भारुड, लोकगीते यांचे स्वर वातावरणात दरवळत होते. प्रत्येक दृश्य मनाला थेट भूतकाळात घेऊन जात होते.

WhatsApp Image 2026 02 12 at 8.23.50 PM 1

लहानग्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात गावची जीवनशैली इतकी जिवंतपणे साकारली की अनेक पालक आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांत नकळत पाणी दाटले. काहीजण म्हणत होते, “आज पुन्हा आमचं बालपण परत आलं…”

WhatsApp Image 2026 02 12 at 10.44.34 AMgr 1

कोणाला आजीची आठवण झाली, कोणाला शेतातले दिवस आठवले तर कुणी चुलीपाशी बसलेले दिवस आठवून गहिवरले. विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत गावाविषयी प्रेम व्यक्त केले. “गाव म्हणजे आपुलकी… गाव म्हणजे माणुसकी… गाव म्हणजे आपलं घर…” असे बोलताना त्यांच्या निरागस भावनांनी सगळ्यांचे मन जिंकले. शाळेचे अध्यक्ष ॲड. जयसिंग चव्हाण यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “आपण कितीही मोठे झालो, कितीही पुढे गेलो, तरी आपल्या मातीशी असलेलं नातं कधी तुटू नये. कारण माणसाची खरी ओळख त्याच्या संस्कारांत आणि गावात दडलेली असते.”तर शाळेच्या संचालकपदी आसणारे अजीत माने म्हणाले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे तर भावनिक जडणघडण आणि आपल्या संस्कृतीशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याची संधी मिळाली.

WhatsApp Image 2026 02 12 at 10.44.33 AM

हा उपक्रम केवळ शालेय कार्यक्रम नव्हता, तसेच हा उपक्रमा विषयी पालकांशी संवाद साधताना शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली लोहीया यांनी सांगितले की, “आपली मुळे आणि संस्कृती जपणे हीच खरी शिक्षणाची सुरुवात आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कृतज्ञता आणि आपल्या मातीतल्या परंपरांबद्दल अभिमान निर्माण होतो.” तर शाळेच्या उपमुख्याध्यापिका नयना कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सुचसंचलन करतांना पालकांना असे सांगितले की, “मुलांना मोठं करताना आपण त्यांना जग देतो, पण त्यांची माती विसरू देऊ नका. कारण माणूस कितीही दूर गेला तरी त्याचं मन नेहमी गावाकडेच धाव घेतं.”

WhatsApp Image 2026 02 12 at 10.44.27 AM
WhatsApp Image 2026 02 12 at 10.44.24 AMq

या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकवृंद सौ. शेटे , सौ काळे सौ. देशमुख, सौ. ढगे, सौ. धोत्रे, सौ. निमगावकर, सौ. कणसे, सौ. चव्हाण, सौ. केंद्रे, पिंपाळकर, कोळकर, गाढवे यांनी विशेष परिश्रम घेतले हे पाहतांना उपस्थितांच्या डोळ्यांत आनंद आणि आठवणींचे अश्रू दाटून आले. प्रत्येकासाठी भावनांचा प्रवास होता. दिवस संपला, पण शाळेच्या अंगणात पसरलेला मातीचा सुगंध आणि आठवणींचा गहिवर मात्र प्रत्येकाच्या मनात कायमचा साठून राहिला.

WhatsApp Image 2026 02 12 at 10.44.23 AM
fqfef
WhatsApp Image 2026 02 12 at 10.44.31 AMee
WhatsApp Image 2026 02 12 at 10.44.30 AM edited

Categories

Recent Posts