Breaking
Updated: नोव्हेंबर 15, 2025
थर्मल पॉवर स्टेशन पुरवठा करारात ३१ लाखांची फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी : थर्मल पॉवर स्टेशन परळी वैजनाथ येथे पुरवठा कराराच्या नावाखाली दोन जणांनी एकूण ३१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संभाजीनगर परळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना २०१७ ते १० ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडली.
सचिन ईश्वर कागदे, वय ४५, रा. शिवाजीनगर, टीपीएस रोड, परळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी २०१७ नंतर पावेतो थर्मल पॉवर स्टेशनच्या बॉयलर साईडसाठी लागणाऱ्या गर्थ गिअर आणि पिनीयन पुरवठ्यासाठी संजय खन्ना, कृष्णा गिअर्स प्रा.लि., गाझीयाबाद यांना १३,००,००० रुपये डिपॉझिट स्वरूपात दिले होते. मात्र त्यांच्या डिलरशिपला रद्द न करता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता साहित्याचा पुरवठा इतर एजन्सीमार्फत करण्यात आला. घेतलेली रक्कम परत मागितल्यावर खन्ना यांनी आज-उद्या करीत पैसे न दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
तसेच बीईएमएल डोझरचे काम मिळवून देण्याच्या कारणावरून खन्ना यांनी ओळख करून दिलेल्या संजय हरदवाणी, रा. काटोल, नागपूर यांनी फिर्यादीकडून घेतलेली १८,००,००० रुपये रोख रक्कमही परत न दिल्याची तक्रार आहे. दोघांनी मिळून एकूण ३१ लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
गुन्ह्याचा तपास पोउपनि शिंदे करत आहेत.