Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन गाडीची दुचाकीला धडक, चौघे गंभीर जखमी

Updated: नोव्हेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

चौघे गंभीर जखमी तेलगाव–धारूर रस्त्यावरील दुर्घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

तेलगाव–धारूर रस्त्यावरील दुर्घटना

किल्लेधारूर (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार २२ नोव्हेंबर रोजी माजलगावहून धारूरमार्गे केजकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील अग्निशमन गाडी क्र. एमएच ०२ जीएच ५७३२ने दुचाकीला दिलेल्या धडकेत नवरा-बायको व दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना धुनकवड फाटा परिसरात घडली.

दुचाकी क्रमांक एमएच ४४ बी १५१८वरून जात असलेले विष्णु दामोदर सुदे, पत्नी कुसुम विष्णु सुदे आणि दोन्ही मुले या धडकेत गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून सर्वांना धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. नंतर त्यांना पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. धडकेत ताफ्यातील सुरक्षा रक्षकही जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.

अपघात एवढा गंभीर होता की दुचाकी अक्षरशः चुराड्यासारखी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली व पंचनामा सुरू केला. अपघाताचे कारण अद्याप निश्चित झाले नसून ताफ्याचा वेग, अचानक समोर आलेली दुचाकी किंवा रस्त्यावरील वाढलेली गर्दी यापैकी कोणते कारण कारणीभूत झाले, याचा तपास सुरू आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी ती तातडीने नियंत्रणात आणली.

धुनकवड–घाटा रस्ता रुंदीकरणाची मागणी जोरात
तेलगाव–धारूर राष्ट्रीय महामार्गावरील धुनकवड ते घाटा दरम्यानचा रस्ता अत्यंत अरुंद असून दोन वाहनांना क्रॉस देताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गावर वारंवार अपघात होऊन अनेकांचे जीव गेले असल्याची नोंद आहे. नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांनी अनेक वेळा रस्ता रुंदीकरणाची मागणी केली, मात्र याकडे शासन स्तरावर दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जाते.

आज झालेला अपघातही याच अरुंद रस्त्यावर झाल्याने आता तरी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या मार्गाचे रुंदीकरण तातडीने करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Categories

Recent Posts