Breaking
वडवणी : ऊसतोडणी करणाऱ्या एका तरुणाने आयुष्यभराचा सोबती शोधण्यासाठी तीन लाख रुपये खर्च करून विवाह केला. मात्र, अवघ्या दोन दिवसांत नववधूने घर सोडले आणि सत्य समोर आलं की ती पाच वर्षांच्या मुलीची आई आहे. हा धक्का सहन होत नसतानाच तरुणाला आपले पैसेही गमवावे लागले. हे प्रकरण आता पोलिसांच्या तपासाअंती फसवणुकीचे असल्याचे समोर आले आहे.
राहुल (नाव बदलले), रा. वडवणी, याचे कुटुंब ऊसतोडणीवर जगते. दीड एकर खडकाळ जमीन, मजुरीचं काम आणि आयुष्यभराची गरिबी – अशा परिस्थितीतही राहुलने पत्नी मिळावी म्हणून तीन लाख रुपये खर्च केले. मागील वर्षी कर्नाटकमध्ये ऊसतोडणीच्या कामावर असताना त्याची ओळख यमुनाबाई शिंदे (रा. सेलू, परभणी) हिच्याशी झाली.
३१ मे रोजी यमुनाबाईने राहुलला सेलूला बोलावून दिलं. तिथे वैभवी राम शेटे (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) हिच्याशी ओळख झाली. लगेचच ती पसंत पडली आणि १ जून रोजी मंदिरात विवाह पार पडला. दुसऱ्या दिवशी देवदर्शन आणि ३ जूनला सत्यनारायण पूजनाचा कार्यक्रमही झाला.
यावेळी पाहुणे जेवत असतानाच नववधूने मैत्रिणीला कॉल करून त्रास होत असल्याचे सांगितले आणि काही वेळातच पोलीस घरी पोहोचले. चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली की वैभवी ही आधीपासूनच एका पाच वर्षांच्या मुलीची आई आहे. त्यासोबतच विवाहासाठी आलेली मंडळीही बनावट नातेवाईक असल्याचे स्पष्ट झाले.
या फसवणूक प्रकरणी नवरी वैभवी राम शेटे (रा. संगमनेर), मध्यस्थी यमुनाबाई शिंदे (रा. सेलू, परभणी), नातेवाईक म्हणून आलेले उमेश राठोड व चंदा राठोड (रा. अकोला), वाहनचालक रणजीत उत्तम आहेर, नवरीची मैत्रीण: मनीषा नरेंद्र नन्नवरे (रा. संगमनेर) यांच्यावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या विवाहासाठी राठोड दाम्पत्याने अडीच लाख रुपये, तर यमुनाबाई शिंदे हिने ५० हजार रुपये घेतले. हे सर्व पैसे राहुलने मुकादमाकडून ऊसतोडणीच्या हंगामात परत करण्याच्या आशेने उचलले होते.
Last Updated: June 7, 2025
Share This Post