Breaking
Updated: एप्रिल 7, 2026
आगामी वर्षात ५०० कोटींचे उद्दिष्ट
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लिमिटेडने ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात २५० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. बँकेच्या या नेत्रदीपक प्रगतीची अधिकृत घोषणा अध्यक्षा सुनंदा मुंदडा यांनी केली असून, संस्थेने आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर बँकेने आपली आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सिद्ध केले असून ठेवीदारांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवले आहे.
बँकेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक आर्थिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत बँकेकडे एकूण १४२ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे बँकेने ९० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करून विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांना आणि गरजूना आर्थिक बळ दिले आहे. बँकेच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे या वर्षात ३५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, अत्यंत कडक आर्थिक शिस्त पाळल्यामुळे नेट एनपीए केवळ १ टक्क्यावर मर्यादित ठेवण्यात बँकेला मोठे यश लाभले आहे. सहकार क्षेत्रात अत्यंत कमी एनपीए राखणे ही बँकेच्या प्रगतीची महत्त्वाची पावती मानली जात आहे.
या यशाचे श्रेय देताना अध्यक्षा सुनंदा मुंदडा यांनी बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि व्यावसायिक भागीदारांच्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला. आमदार नमिता मुंदडा, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि पन्नगेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली बँक प्रगतीपथावर मार्गक्रमण करत असून या प्रगतीमध्ये संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वर्षासाठी निश्चित केलेले ५०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश शर्मा यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.