Breaking
Updated: डिसेंबर 8, 2025
परळीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यायामावरून परतणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून डोळ्यात मिरचीची चटणी टाकत जबरी लूट करणाऱ्या टोळीला बीड स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, चार आरोपींना ताब्यात घेऊन १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धक्कादायक घटना ५ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी परळीतील देवी मंदिर रोड परिसरात घडली. फिर्यादी तरुण ‘बॉस फिटनेस’ येथून व्यायाम करून मोटारसायकलवरून धारावती तांडा गावाकडे जात असताना दोन इसमांनी पल्सर दुचाकी आडवी लावून त्याला अडवले. त्याचवेळी स्कुटीवरून आलेल्या इतर दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्याच्या डोळ्यात मिरचीची चटणी फेकली. या प्रकारानंतर आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या जबरीने पळवून नेल्या.
या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०९ (४), १२६, २८१, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात वाढत चाललेल्या जबरी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या पथकाने परळी परिसरात तपासाची चक्रे फिरवली.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे चौघांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पंकज तुकाराम उगलमुगले (वय २५, रा. पाडळी, ह.मु. पांगरी), वैभव राम बिडगर (वय २०, रा. दाऊतपूर), श्यामसुंदर बालासाहेब फड (वय २०, रा. मरळवाडी) आणि आदित्य सुरेश उपाडे (वय २०, रा. सिद्धार्थ नगर, परळी) अशी आहेत.
पोलीस चौकशीत आरोपींनी जिमबाहेरूनच फिर्यादीचा पाठलाग करून निर्जन ठिकाणी गाठून लूट केल्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीची सोन्याची चैन, अंगठी, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, स्कुटी आणि एक कोयता असा एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक सुशांत सुतळे, हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे आणि चालक अतुल हराळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.