Breaking
Updated: फेब्रुवारी 21, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: माजलगाव शहरातील बीड रोड या मुख्य रस्त्यावर असलेल्या व्यंकटेश लॉजमध्ये एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीकृष्ण प्रकाश डाके (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते तालुक्यातील नित्रुड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री हॉटेल मॅनेजरच्या लक्षात आली असून या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
घटनेच्या तपशिलानुसार श्रीकृष्ण प्रकाश डाके यांनी रविवार १५ फेब्रुवारी रोजी व्यंकटेश लॉजमध्ये राहण्यासाठी खोली बुक केली होती. गेल्या पाच दिवसांपासून ते या लॉजमध्ये वास्तव्यास होते. मात्र शुक्रवारी दिवसभर त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून उघडला गेला नाही. लॉजमध्ये सतत वावर असणारी ही व्यक्ती अचानक दिवसभर बाहेर का आली नाही, असा संशय तेथील कर्मचाऱ्यांना आला. संशय बळावल्याने त्यांनी पोलिसांना कळवले आणि दरवाजा उघडला असता श्रीकृष्ण डाके हे खोलीत निश्चेष्ट अवस्थेत आढळून आले.
माजलगाव शहर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत व्यक्तीजवळ सापडलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजलगाव पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण उघड होईल.