Breaking
Updated: जानेवारी 17, 2026
घातपाताचा संशय, बीडमध्ये खळबळ
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelघातपाताचा संशय, बीडमध्ये खळबळ
बीड: येथील जीएसटी कार्यालयात कार्यरत असलेले राज्य कर अधिकारी सचिन नारायण जाधवर यांचा मृतदेह आज सकाळी कपिलधार रोडवरील कमानीजवळ त्यांच्याच कारमध्ये संशयास्पद स्थितीत आढळून आला. काल ड्युटी संपल्यानंतर ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या मृत्यूचा सखोल तपास सुरू आहे.
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चुंब येथील असलेले ३५ वर्षीय सचिन जाधवर हे सध्या बीडमधील शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास होते. काल नेहमीप्रमाणे ते कार्यालयात कामासाठी गेले होते, मात्र रात्रभर घरी न पोहोचल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवली असता ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची कार उभी असल्याचे दिसून आले. गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये जाधवर यांचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. शिवाजीनगर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सचिन जाधवर हे २०१२ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) म्हणून निवडले गेले होते. प्रशासकीय सेवेसोबतच त्यांनी ‘आय एम इंग्लिश’ (IM English) या नावाने लोकप्रिय युट्युब चॅनल चालवून आणि इंग्रजी व्याकरणावर पुस्तके लिहून राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पोलिसांनी त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.