अंबाजोगाई : कामगार संघटनांनी गुरुवारी (दि.१२) पुकारलेल्या बंदला बँक कर्मचाऱ्यांच्या एआयबीईए या संघटनेने पाठिंबा देऊन बँक कर्मचारिही या संपात सहभागी झाले होते. या संपामध्ये येथील बँक ऑफ महाराष्ट्र अंबाजोगाई व लोखंडीसावरगाव शाखेतील रविंद्र रांजणकर, नागेश रोडे, प्रशांत काळबांडे, अरुण शिंदे, अमोल गायकवाड, सुशांत वैद्य तसेच सेवानिवृत्त सुभाष ताटे, श्रीपाद खारकर व प्रमोद ढोकणे हे सहभागी झाले होते. सरकार गेल्या १० वर्षांपासून केंद्रीय कामगार संघटनाशी चर्चा करण्यास तयार नाही.कामगारांच्या भवितव्याशी निगडित किती तरी निर्णय कोणालाही विचारात न घेता घेतले जात आहेत. तसाच निर्णय घेऊन सरकारने नवीन कामगार कायदे अमलात आणल्याने याचा दुष्परिणाम कामगारांच्या जीवनावर खूप खोलवर आघात करणारा असल्याचे बँक संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संपाच्या निमित्ताने आपण सरकारकडे केलेल्या मागण्या अशा आहेत. बँक व विमा उद्योगाचे कोणतेही खाजगीकरण तात्काळ थांबवावे, आयडीबीआय बँकेची विक्री त्वरित रद्द करावी, विमा क्षेत्रात १०० टक्के परकीय थेट गुंतवणुकीची तरतूद मागे घ्यावी, सर्वसाधारण विमा उद्योगात एकत्रीकरणाचे धोरण अमलात आणावे, तरुणांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत, शोषणावर आधारलेली कंत्राटी पद्धत व आऊटसोर्सिंग रद्द करावी, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी व तरुणांचे भविष्य सुरक्षित करावे, फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट ही कामगारविरोधी पद्धत पूर्णतः रद्द करावी अशा विविध मागण्या केल्या आहेत.