Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

हज यात्रेकरूंची अडचण दूर; अंबाजोगाईतच होणार वैद्यकीय तपासणी

Updated: फेब्रुवारी 9, 2026

By Vivek Sindhu

Picsart 26 02 09 14 04 47 058 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे तांत्रिक अडचणीवर यशस्वी तोडगा

​अंबाजोगाई: पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या वैद्यकीय तपासणीचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आता ही तपासणी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही सुविधा तांत्रिक कारणास्तव बंद झाल्याने भाविकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आमदार मुंदडा यांनी थेट राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून उद्या मंगळवारपासून ही प्रक्रिया पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे.

​हज यात्रेला जाण्यापूर्वी प्रत्येक भाविकाला वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य असते. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात मागील ३० ते ३५ वर्षांपासून ही सोय उपलब्ध होती. मात्र यावर्षी आरोग्य विभागाने ऑनलाइन नोंदणीसाठी नवीन ॲप सुरू केले आणि त्याचा ‘पासवर्ड’ केवळ बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडेच उपलब्ध करून दिला. यामुळे अंबाजोगाई येथील रुग्णालयाने तपासणी करण्यास असमर्थता दर्शवली होती. अंबाजोगाईपासून बीडचे अंतर १०० किलोमीटर असल्याने वृद्ध भाविकांना शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब स्थानिक प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर आमदार नमिता मुंदडा यांनी तात्काळ दखल घेतली.

​आमदार मुंदडा यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांना लेखी पत्र देऊन ही अन्यायकारक अट शिथिल करण्याची मागणी केली होती. अंबाजोगाई येथे मोठे वैद्यकीय महाविद्यालय असताना केवळ एका पासवर्डमुळे भाविकांना जिल्हा ठिकाणी जावे लागणे चुकीचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. त्यांच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. आता बीड जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आयडीचा समन्वय साधून अंबाजोगाईतच ही तपासणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

​या संदर्भात स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, जरी पासवर्ड जिल्हा स्तरावर असला तरी समन्वय साधून मंगळवारपासून स्थानिक पातळीवर तपासणी सुरू होईल. दरम्यान, या प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. अंबाजोगाईत आतापर्यंत ४४ भाविकांनी तपासणी केली असली तरी केवळ २२ जणांचीच ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित भाविकांनी लसीकरणातील तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आपली नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Categories

Recent Posts