Breaking
Updated: मार्च 25, 2026
पुणे कृषी महाविद्यालयातील मेसमध्ये आष्टी तालुक्यातील विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये जलशुद्धीकरण यंत्रातून वीज प्रवाह उतरल्याने एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. चैतन्य कुंडलिक चव्हाण असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी होता. कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणारा चैतन्य १४ मार्च रोजी मेसमध्ये फिल्टरची पाहणी करत असताना त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. बेशुद्ध अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र आठवडाभराच्या झुंजार उपचारानंतर मंगळवारी त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात मोठी शोककळा पसरली असून प्रशासकीय हलगर्जीपणावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. चैतन्य हा मेसच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या ‘ई-मेस’ समितीचा सक्रिय सदस्य होता. विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्यरत असतानाच त्याच्यावर हा काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या गंभीर घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची आणि संपूर्ण महाविद्यालय परिसराचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्याची मागणी लावून धरली आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अधिकृत तक्रारीनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.