Breaking
Updated: June 18, 2025
WhatsApp Group
Join Nowस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चोरीचा ऐवज जप्त
केज – येथील एका सोन्याच्या दुकानातून चांदीच्या चैनची चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. चार महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 17 जून रोजी कुंदन बालासाहेब जोगदंड (वय 23, रा. कानडी रोड, केज) यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्यांच्या ‘श्री ज्वेलर्स’ नावाच्या दुकानात चार अज्ञात महिला ग्राहक म्हणून आल्या. पायातील चांदीची चैन पाहण्याच्या बहाण्याने त्यांनी दुकानातील अनेक चैन पाहिल्या आणि दुकान मालकाचे लक्ष विचलित करून त्यातील चांदीच्या चैन चोरून नेल्या.
या घटनेवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सोपवला. तपासादरम्यान 17 जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीतील महिला नगर रोडवरील नगर नाका, बीड येथे बसची वाट पाहत उभ्या आहेत.
सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत सुमन पोपट येडवे (वय 52), कलावती मोतीराम केंगार (वय 56), बबिता भाऊराव केंगार (वय 61) आणि द्वारकाबाई सतीश बोराडे (वय 40)
(सर्व रा. मुर्शदपूर, ता. व जि. बीड) या चार महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पर्सची तपासणी केली असता, त्यामध्ये चोरीस गेलेल्या चांदीच्या चैन सापडल्या. चौकशीत त्यांनी केज येथील श्री ज्वेलर्समधून त्या चैन चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचा ऐवज जप्त करून आरोपी महिलांना पुढील तपासासाठी केज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पो. ह. मारोती कांबळे, विकास राठोड, विष्णू सानप, सचिन आंधळे, महिला पोलीस स्वाती मुंडे आणि चालक नितीन वडमारे यांनी केली.