Breaking
Updated: एप्रिल 2, 2026
केंद्रीय मंत्री निर्मला सीमारामन, अश्विनी वैष्णव यांना दिले निवेदन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: कोरोना महामारीच्या काळात रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद करण्यात आली होती. ही सवलत अद्यापही सुरू न झाल्याने देशातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ही सवलत पुन्हा एकदा पूर्ववत करावी, या मागणीसाठी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांना आग्रही मागणीचे निवेदन दिले.
भारतीय रेल्वेने वरिष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट दरात विशेष सवलत देण्याची तरतूद केली होती. मात्र, कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी आणि आर्थिक कारणास्तव ही सवलत तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आता परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आली असली, तरी ही सवलत अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी असून, त्यांना प्रवासासाठी पूर्ण तिकीट दर मोजावे लागत आहेत. खा.बजरंग सोनवणे यांनी दिल्ली येथे वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या समस्येचे गांभीर्य पटवून दिले. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयोमानानुसार प्रवासाची गरज असते, मात्र वाढत्या तिकीट दरांमुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही केवळ सवलत नसून तो त्यांचा सन्मान आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
००
बीडच्या प्रवाशांना दिलासा मिळणार?
बीड जिल्ह्यातून परगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत मिळाल्यास त्याचा मोठा फायदा जिल्ह्यातील हजारो वृद्धांना होऊ शकतो. खा.सोनवणे यांनी परळी-मुंबई रेल्वे विस्तारासह आता ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीचा प्रश्न लावून धरल्याने जिल्हयातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. ही सवलत लवकरच सुरू होईल, अशी आशा आता निर्माण झाली आहे.