Breaking
Updated: डिसेंबर 27, 2025
आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे तांत्रिक अडचणीवर यशस्वी तोडगा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआ. नमिता मुंदडा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात पणन महासंघाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाणा टंचाईमुळे गेली अनेक दिवसांपासून सोयाबीन खरेदी बंद झाली असून या खरेदी केंद्रावर तातडीने बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,
बीड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आलेली असल्याने खरेदी केंद्रावर सोयाबीनची आवक मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे. परंतु जिल्ह्यातील पणन महासंघाच्या ४८ खरेदी केंद्रांवर मागील सहा दिवसांपासून बारदाणा उपलब्ध नसल्याने सोयाबीन खरेदी पूर्णतः ठप्प आहे. परिणामी हजारो शेतकऱ्यांना आपले सोयाबीन विक्री करता येत नसून त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
खरेदी केंद्रांवर बारदाणा नसल्याने केंद्रे बंद ठेवावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने बाजारात कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत असून हमीभाव मिळत नसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काही शेतकरी वाहतूक खर्च करून माल खरेदी केंद्रांवर घेऊन येतात, मात्र खरेदी बंद असल्याने त्यांना तोच माल परत घेऊन जावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च वाढत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांमधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून सोयाबीनची अपेक्षित आवक किती असेल याचा अचूक अंदाज न घेतल्यामुळे व बारदाणा पुरवठ्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. खरेदी केंद्रांवर आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असून खरेदी बंद राहिल्याने शेतकऱ्यांच्या रांगा वाढत आहेत. शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदीवर विश्वास ठेवून आपला माल रोखून धरलेला आहे. त्यामुळे सर्व खरेदी केंद्रांवर तातडीने मुबलक प्रमाणात बारदाणा उपलब्ध करून देऊन सोयाबीन खरेदी सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे.
तरी बीड जिल्ह्यातील पणन महासंघाच्या सर्व खरेदी केंद्रांवर तातडीने मुबलक प्रमाणात बारदाणा उपलब्ध करून देऊन सोयाबीन खरेदी त्वरित सुरू करण्याबाबत आदेश व्हावेत, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.