Breaking
Updated: एप्रिल 3, 2026
सहा जणांना अटक करून पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहर पोलिसांनी कारखाना रोडवरील जान्हवी हॉटेल परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर गुरुवारी धाड टाकून मोठी कारवाई केली. ‘तिरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या ६ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि दुचाकींसह एकूण ४ लाख ७३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कारखाना रोड परिसरातील जान्हवी हॉटेलच्या मोकळ्या जागेत काही इसम पैशांवर तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी सहा जण गोलाकार पद्धतीने बसून पैशांवर जुगार खेळताना पोलिसांना मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद खतीब (रा. खतीब गल्ली), सद्दाम बागवान (रा. बागवान गल्ली), शेख अजहर जिलानी (रा. खतीब गल्ली), श्रीराम बारगजे (रा. रायगडनगर), नागनाथ ढगे (रा. रायगडनगर) आणि धर्मराज वाघमारे (रा. मोरेवाडी) या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तिरट जुगाराचे ११ हजार ६७० रुपये रोख, १ लाख ३७ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि ३ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली असा एकूण ४ लाख ७३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पीएसआय आनंद शिंदे, पोलीस अंमलदार पांडुरंग काळे, हनुमंत चादर, प्रवीणकुमार गित्ते, सुशांत गायकवाड आणि भागवत नागरगोजे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विजयसिंग गायकवाड करत आहेत.