Breaking
Updated: सप्टेंबर 30, 2025
एएसपी चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला प्रकार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : केज तालुक्यातील उमरी टोलनाका परिसरात पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनधिकृतपणे वाहतूक करताना एक पिकअप वाहन अडवले. पुतळ्याची वाहतूक कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता होत असल्याने तिघांविरुद्ध पुतळा पवित्रता भंग प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ३० सप्टेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास करण्यात आली. पोलीस अंमलदार किशोर गोपाळराव गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे, २९ सप्टेंबर रोजी रात्री ते व सोबतचे पोलीस कर्मचारी रात्रगस्त करत असताना राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी वरील उमरी टोलनाक्याजवळ एक महिंद्रा पिकअप (क्र. MH28BB2848) थांबवले. वाहनातील ताडपत्रीखाली मोठा पुतळा आढळून आला. चौकशीत वाहन चालक अमोल विष्णु गळकर (वय २७) व सोबती भगवान ज्ञानेश्वर माटे (वय ३३, दोघे रा. गागलगाव, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांनी तो पुतळा मलकापूर येथून आणल्याचे सांगितले.
थोड्याच वेळाने नाना तात्याराम मुळे (रा. उमरी, ता. केज) हे तेथे आले. त्यांनी पुतळा उमरी गावात बसविण्यासाठी मागविल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्याकडे शासनाकडून कोणतीही परवानगी नसल्याचे उघड झाले. पंचासमक्ष पुतळ्याचा पंचनामा करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी अमोल गळकर, भगवान माटे व नाना मुळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पुतळा पवित्रता भंग प्रतिबंध अधिनियमसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम माणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.