Breaking
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारीतील शेकडो पालख्या अंबाजोगाईत दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर श्री योगेश्वरी मंदिर प्रशासन व देवल कमिटीच्या वतीने जवळपास १०० हून अधिक पालख्यांचे व हजारो वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत करण्यात आले.
या सर्व वारकऱ्यांसाठी मुफ्त चहा, नाष्टा, भोजन तसेच निवासाची सोय करण्यात आली असून, अत्यंत शिस्तबद्ध व सुसज्ज पद्धतीने सेवा दिल्याची माहिती श्री योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव प्रा. अशोक लोमटे व उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
श्री योगेश्वरी देवीचे मंदिर हे प्राचीन व श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र असून दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नियमित दर्शनार्थींना देण्यात येणाऱ्या महाप्रसादासोबतच, या वारीमध्ये सहभागी झालेल्या दिंड्यांतील वारकऱ्यांसाठी देखील विशेष व्यवस्थेची आखणी करण्यात आली होती.
गेल्या महिनाभरात मंदिरात आलेल्या १०० हून अधिक पालख्यांचे व त्यांच्यासोबतच्या मंडळींचे स्वागत विशेष सन्मानाने करण्यात आले. आलेल्या प्रत्येक पालखीत सहभागी वारकऱ्यांनी मंदिर प्रशासनाने दिलेल्या सेवांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
याचबरोबर वारीत सहभागी होत असलेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व प्राथमिक औषधोपचार मंदिर परिसरातच उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे सचिव प्रा. लोमटे व उपाध्यक्ष मोदी यांनी सांगितले. देवल कमिटीच्या या उपक्रमामुळे अंबाजोगाईतील सामाजिक व धार्मिक सेवाभावाचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.
Last Updated: July 5, 2025