Breaking
Updated: June 2, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आवाहन
केज – खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. आता पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते घेऊन शेतात जाण्यासाठी रस्त्याची गरज भासणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, अथवा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर अडथळा निर्माण झालेला आहे. असे शेतरस्ते खुले करण्याचे नियोजन केले असून गरजू शेतकऱ्यांनी १० ते १३ जून दरम्यान आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीपूरक रस्ते अत्यंत आवश्यक आहेत. शेतकरी आपल्या शेतावर वेळेवर पोहचू शकतील, उत्पादनाची वाहतूक सुकर होईल यासाठी शेत रस्त्यांचे अस्तित्व आणि मोकळे पण महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार तसेच मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार तहसीलदारांना शेतरस्ते उभारणी व अडथळा दूर करण्याचे अधिकार आहेत. सद्यस्थितीत केज तालुक्यातील ३४० अर्जापैकी ४८ शेतरस्ते खुले करणे शक्य झाले आहे. उर्वरित प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. लवकरच खरीप हंगाम सुरु होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीपर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेत रस्ता उपलब्ध नाही किंवा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर अडथळा निर्माण झालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १० जून ते१३ जून २०२५ दरम्यान विशेष शेत रस्ता अर्ज स्वीकृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतरस्त्याची गरज आहे, अशा शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष येऊन अर्ज करावावेत. या चार दिवसांच्या विशेष मोहिमेत प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करून शेत रस्ते खुले करण्याचे नियोजन तहसील प्रशासनाने केले आहे. तर ग्रामविकास विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, पोलीस प्रशासन तसेच महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयाने काम केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे.