गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई करणार : पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत
बीड : शहरातील सावरकर प्राथमिक विद्यालयाच्या आवारात शाळेतील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पाथरूड गल्लीतील काही युवकांनी थेट शाळेत घुसून एका विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकाला बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना २३ जुलै रोजी घडली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्व आरोपींची ओळख पटली असून यातील आठ प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीत अनेश नरेश गायकवाड (२५), साहिल नरेश गायकवाड (२१), शेखर रत्नाकर जाधव (३१), आकाश पालकर जाधव (३९) सर्व राहणार पाथरूड गल्ली, बीड यांचा समावेश आहे.
या आरोपींपैकी दोघांवर यापूर्वीही मारहाणीचे गुन्हे दाखल असून ते अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. तसेच या प्रकरणातील चार अल्पवयीन आरोपींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आरोपी फरार होते. मात्र पोलिसांनी कसून तपास करत त्यांना गजाआड केले. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्पष्ट केले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पो.उ.नि. महेश जाधव, पो.ह. संजय राठोड, गहिनीनाथ बावनकर, राम पवार आणि बापू गायकवाड यांच्या पथकाने केली.
या घटनेमुळे शाळांतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून पालक वर्गामध्येही संतापाचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस विभाग अधिक सतर्क राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.