Breaking
Updated: सप्टेंबर 17, 2025
5 मराठा बांधवांना मिळाले प्रमाणपत्र
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यास सुरूवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज 5 मराठा बांधवांना हे प्रमाणपत्र दिले गेले. त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी बलिदान देणाऱ्या अनेकांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मनोज जरांगे यांच्या गतवर्षीच्या आंदोलनानंतर राज्यातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले होते. पण मध्येच ही प्रक्रिया मंदावली होती. त्यानंतर जरांगेंनी पुन्हा मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडले. तसेच सरकारला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यातील नोंदींच्या आधारावर मराठा बांधवांना कुणबीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्यास भाग पाडले. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांतील मराठा बांधवांना पुरावे सादर केल्यानंतर हे प्रमाणपत्र जारी करण्यात आले. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातही हे प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरूवात झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बीड जिल्ह्यातील 5 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यात आले. हे प्रमाणपत्र हाती पडताच संबंधितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केलेले हे प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटमधील नोंदीच्या आधारावर जारी करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या हस्ते मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या कवडे नामक व्यक्तीच्या कुटुंबियांनाही यावेळी 10 लाखांची मदत देण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, नारायण गडाचे प्रमुख शिवाजी महाराज व्यासपीठावर उपस्थित होते.
दुसरीकडे, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातही कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 4 जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हिंगोलीतही 50 उमेदवारांना हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र दिले गेले.
दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देत या प्रमाणपत्र वाटपावर समाधान व्यक्त केले आहे. मराठवाड्याला मुक्ति मिळाली. आता मराठ्यांनाही मुक्ति मिळाली पाहिजे, असे ते म्हणालेत. आज कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांनी आंतरवाली सराटीला यायचे आहे. मला ते प्रमाणपत्र पाहू द्या. सरकारने नेमके कोणते प्रमाणपत्र दिले हे मला पाहू द्या. हे प्रमाणपत्र जीआरच्या आधारावर दिले की नाही ते पाहू द्या, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचे आवाहनही सरकारला केले.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाळीव प्राणी वाहून गेलेत. त्यामुळे सरकारने सरसकट मदत करावी अशी माझी मागणी आहे. आरक्षणाच्या मुद्यावर मागेपुढे काही करण्याचा प्रयत्न झाला तर दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.