Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

ई-केवायसी कामात हलगर्जीपणा: ३२ ग्रामरोजगार सहायकांची सेवा थेट समाप्त

Updated: फेब्रुवारी 21, 2026

By Vivek Sindhu

ई-केवायसी कामात हलगर्जीपणा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई पंचायत समितीचा मोठा निर्णय

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ३२ ग्रामरोजगार सहायकांना कामातील हलगर्जीपणा आणि वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन करणे चांगलेच भोवले असून त्यांची सेवा तडकाफडकी समाप्त करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मजुरांचे आधार ई-केवायसी अद्ययावत करण्याच्या कामात टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी ही कठोर कारवाई केली. नागपूर येथील नरेगा आयुक्तांच्या थेट आदेशानंतर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरातील कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शासनाकडून मनरेगा मजुरांच्या आधार ई-केवायसीचे काम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. या महत्त्वाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी ग्रामरोजगार सहायकांवर सोपवण्यात आली होती आणि त्यासाठी पंचायत समिती स्तरावरून वारंवार सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, गेवराई तालुक्यातील या ३२ सहायकांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये ई-केवायसीचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठांच्या आदेशांना केराची टोपली दाखवून जाणीवपूर्वक कामात दिरंगाई केल्याने नरेगा आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली आणि संबंधित सहायकांची सेवा तातडीने समाप्त करण्याचे निर्देश दिले.
या आदेशाची अंमलबजावणी करत गटविकास अधिकारी सानप यांनी १६ फेब्रुवारी २०२६ पासून या ३२ ग्रामरोजगार सहायकांच्या सेवा अधिकृतपणे समाप्त केल्या आहेत. या कारवाईचा अहवाल बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आणि उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील मजुरांची कामे खोळंबू नयेत आणि योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी रिक्त झालेल्या जागांवर तातडीने नवीन ग्रामरोजगार सहायकांची नियुक्ती करण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


Categories

Recent Posts