परळी : राज्यातील पाच प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांना गती देण्यासाठी आता वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला असून, हे अधिकारी आपल्या नियुक्त तीर्थक्षेत्रातील प्रकल्पांची नियमित आढावा बैठक घेऊन अहवाल थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशावरून निर्णय; परळीसाठी आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे जबाबदारी
या महत्त्वपूर्ण योजनेत परळी वैजनाथ (जि. बीड) या ज्योतिर्लिंगाच्या विकास आराखड्याची जबाबदारी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे देण्यात आली आहे. परळी क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात २८६ कोटी ६८ लाख रुपये इतक्या निधीतून एकूण ९२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामांमध्ये मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी निवास, रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व पर्यटन विकास यांचा समावेश आहे.
ही नियुक्ती राज्य शासनाने प्रथमच अशा पद्धतीने उच्च पातळीवर समन्वयासाठी केली असून, त्यामुळे आराखड्यांची अंमलबजावणी अधिक गतिमान, प्रभावी आणि दर्जेदार होण्याची अपेक्षा आहे. परळी वैजनाथसह अन्य चार ज्योतिर्लिंगांसाठीही याच पद्धतीने वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
या पाचही तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समित्यांकडून मंजुरी मिळाली असून, शासन निर्णयांद्वारे कामांना मान्यता दिली गेली आहे. यामध्ये परळीबरोबरच भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि औंढा नागनाथचा समावेश आहे.
हे अधिकारी आता शासन, स्थानिक प्रशासन आणि मंदिर ट्रस्ट यांच्यात समन्वय साधून प्रकल्पांची अंमलबजावणी योग्य रीतीने होती आहे की नाही, याकडे लक्ष ठेवणार आहेत.