Breaking
Updated: मार्च 14, 2026
राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकनासाठी निवड, जिल्ह्याचा गौरव
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील राडी आरोग्य उपकेंद्राने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (NQAS) कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरील मानांकनासाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या या कडक मूल्यमापन प्रक्रियेत राडी उपकेंद्राने १०० पैकी ८५% गुण मिळवून जिल्हा आणि राज्य स्तरावरील टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. या महत्त्वपूर्ण यशामुळे आता या उपकेंद्राची निवड राष्ट्रीय स्तरावरील अंतिम मानांकनासाठी करण्यात आली असून, यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मदत होणार आहे.
या मानांकन प्रक्रियेत उपकेंद्राच्या इमारतीची पायाभूत सुविधा, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे सूक्ष्म परीक्षण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने माता व बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, संक्रामक व असंसर्गजन्य रोगांचे प्रतिबंधात्मक उपचार, मानसिक आरोग्य आणि आपत्कालीन आरोग्य सेवा यांसारख्या ३८० मुद्द्यांच्या चेकलिस्टची पडताळणी करण्यात आली. राज्याच्या आरोग्य विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, राज्यातील ११० आरोग्य संस्थांची या मानांकनासाठी निवड झाली असून, डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे १००% ‘NQAS’ प्रमाणित करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.
या यशासाठी लातूर परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालिका डॉ. रेखा गायकवाड, बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहेमान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, NQAS चे मुल्यामापक डॉ. शहाजी लोमटे, जिल्हा समन्वयक डॉ. गव्हाणे, डॉ. जयश्री दराडे, डॉ. आशा मारवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित अंजान, डॉ. रंगनाथ आदनाक यांचे मार्गदर्शन आणि राडीचे सरपंच प्रशांत गंगण, ग्राम विकास अधिकारी देशमाने यांचे सहकार्य लाभले. राडी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. किरण लोंढे, आरोग्य निरिक्षक, योगेश कोमावार, आरोग्य सेविका प्रियंका कराड, संगिता सेलुकर, आरोग्य सेवक दत्तात्रय मोरे, नंदकिशोर घुले, अर्धवेळ सेविका लक्ष्मी जाधव तसेच बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि राडी येथील सर्व कर्मचारी, आशाताई यांनी या मानांकनासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेने मिळवलेल्या या बहुमानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे परिसरातील नागरिकांना आता अधिक दर्जेदार आणि विश्वासाहू आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.
“रुग्णांना अधिक गुणवत्तापूर्वक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी या वर्षअखेरपर्यंत तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्र NQAS सर्टिफाइड करण्याचे उद्दिष्ट आहे” — डॉ. बालासाहेब लोमटे, तालुका वैद्यकीय अधिकारी
“NQAS चे मानांकन ग्रामीण आरोग्य सेवेला राष्ट्रीय स्तरावरील सेवांचा दर्जा मिळवून देणारे आहे. यामुळे पायाभूत सुविधा, रुग्णांसाठीच्या आरोग्यसेव व त्यांच्या गुणवत्तेचा दर्जा निश्चितच उंचावत आहे” – डॉ. किरण लोंढे, समुदाय आरोग्य अधिकारी, राडी उपकेंद्र