बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायाच्या घटनांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर, राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत येथील पोलीस अधीक्षकांची बदली केली. त्यामुळे, येथे नवनीत कावत या नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षकांकडे बीडची जबाबदारी देण्यात आली. कावत यांनी बीडमधील गुन्हेगारांवर वचक बसवत थेट मोक्काअंतर्गत कारवाईला सुरुवात केली आहे. वाल्मिक कराड आणि गँगवर मोक्का लावल्यानंतर आता केज तालुक्यातील विडा येथे अवादा पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण करणाऱ्या टोळीवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
बीडच्या SP कडून टोळीवर मोक्का, चौघांना अटक
बीड पोलिसांनी येथील वॉचमला मारहाण करत चोरी टकरणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. 7 एप्रिल रोजी वॉचमन अभिजीत दुनघव या वॉचमनला सतरंजीने हात पाय बांधत रोटर केबल, स्टार्टन केबल, अर्थिंग केबल असे एकूण 12 लाख 87 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणातील आरोपी बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे, लालासाहेब सखाराम पवार असे 4 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते. तसेच या गुन्ह्यात इतर 6 आरोपी निष्पन्न झाले असून ते अद्याप फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात बीड व धाराशिव जिल्ह्यात संघटित रित्या केज, नेकनूर, ढोकी, वाशी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, आता या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
आता, या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव बीड बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वीरेंद्र मिश्रा विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना पाठवला होता, या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या चोरी प्रकरणी 10 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याआधी बीड मधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी बीड पोलिसांनी आतापर्यंत चार टोळींवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. त्यामध्ये, वाल्मिक कराडसह विष्णू चाटे आणि त्यांच्या गँगवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या वाल्मिक कराड आणि गँग तुरुंगात आहे.