Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण:वर्षभरानंतरही न्याय नाही, बंधू धनंजय आणि लेक वैभवीने अजित पवारांसमोर मांडली व्यथा

Updated: नोव्हेंबर 29, 2025

By Vivek Sindhu

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण:वर्षभरानंतरही न्याय नाही

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मस्साजोग – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी वैभवी देशमुख हिच्या शिक्षणाची विचारपूस केली. हत्येला एक वर्ष झाले, तरी दादा अजून आम्हाला न्याय मिळाला नाही, अशी खंत वैभवी देशमुख हिने व्यक्त केली. तर गावकऱ्यांनी देखील अजित पवारांकडे न्यायाची मागणी केली.

गत वर्षी 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली होती. या प्रकरणात सत्ताधारी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले तरीही न्यायालयात अजून आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत, तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे देशमुख कुटुंब आजही न्यायासाठी संघर्ष करत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांना आदरांजली वाहिली, तसेच कुटुंबीयांची भेट घेत विचारपूस केली.

दादा अजून आम्हाला न्याय मिळाला नाही

यावेळी संतोष देशमुखांची लेक वैभवी हिने अजित पवारांसमोर आपली व्यथा मांडली. मी शिक्षणासाठी दुसऱ्या गावी गेली असली, तरी माझे अर्ध लक्ष घरीच असते, असे ती म्हणाली. बाबांना जाऊन वर्ष होत आले, तरी अद्याप आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद कुठूनच भेटत नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही, असे वैभवी देशमुख म्हणाली.

एसपी बदलून काही फरक पडला नाही

यावेळी गावकरी अजित पवारांना म्हणाले, संतोष देशमुख कुणाच्या भांडणात नव्हते. कुणाच्या अध्यातमध्यात नव्हते. मात्र, तरीही त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी, यासाठी गावकऱ्यांची तळमळ आहे. एका माणसासाठी संपूर्ण गाव कधी एकत्र आलेला आहे का? एसपी बदलून फरक पडला नाही, एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.

अण्णावर जीवापार प्रेम करायचो

दरम्यान, आज सकाळी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना भावाच्या आठवणीने अश्रू अनावर झाले. ” आपल्या भावाला जाऊन वर्ष झाले तरीही आम्हाला न्याय मिळत नाही. माझे माझ्या भावावर जीवापाड प्रेम होते, कर्ता माणूसच घरातून गेला… आता आमचे कसे होणार?”आमचा निष्पाप माणूस या क्रूरकर्मी लोकांनी कायमचा हिरावून नेला. आमचे हसते-खेळते कुटुंब दृष्ट लागल्यासारखे उध्वस्त झाले,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संतोष यांची कन्या वैभवी हिने काका धनंजय यांचे सांत्वन करत त्यांचे अश्रू पुसले. हे दृश्य पाहून उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले.

वडिलांना न्याय मिळावा – वैभवी देशमुख

बाबा जाऊन एक वर्ष झाले. अजूनही त्यातील एका आरोपीला अटक झालेली नाही. माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी वैभवीने सरकारकडे केली.


Categories

Recent Posts