Breaking
Updated: सप्टेंबर 30, 2025
सरकारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यावर हल्ला; तिघांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : सरकारी दवाखाना बीड येथील कर्मचाऱ्यास मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बीड जिल्हा सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांनी हा निकाल ३० सप्टेंबर रोजी दिला.
शिक्षा झालेल्यांमध्ये इसराईल इस्माईल शेख, ज्ञानेश्वर बाबासाहेब शिंदे आणि संतोष वैजिनाथ थोरात (सर्व रा. बीड) यांचा समावेश आहे.
ही घटना २५ डिसेंबर २०२१ रोजी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान घडली. फिर्यादी प्रशांत प्रभाकर सुकाळे हे सरकारी दवाखाना बीड येथे ब्रदर म्हणून कार्यरत होते. त्या वेळी वार्ड क्रमांक पाचमध्ये कर्तव्य बजावत असताना आरोपी इसराईल सय्यद यास दाखल करण्यासाठी आणण्यात आले. मात्र त्याच्यासोबत आलेल्या ज्ञानेश्वर शिंदे यांनी दाखल न करता रुग्णास घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरला. यावरून वाद वाढला. यानंतर इसराईल सय्यद याने फोनवरून संतोष थोरात यास बोलावले. थोरात याने फोनवरूनच फिर्यादीला धमकावत शिवीगाळ केली आणि “तुला कुठेही मारून टाकीन” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी इसराईल व शिंदे यांनी फिर्यादीला कॉलरला धरून बाहेर आणले. तिथे संतोष थोरात व अन्य पाच अनोळखी आरोपींनी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातून शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. या घटनेची फिर्याद बीड शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार गुन्हा नोंद करून तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे फिर्यादीसह एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये कार्यालयीन सहकारी शेख अहमद, अरुण भारती, वैद्यकीय अधिकारी गिरीश गुट्टे व तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक पवनकुमार अंधारे यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. न्यायालयाने उपलब्ध पुरावे व साक्षांच्या आधारे आरोपी इसराईल शेख, ज्ञानेश्वर शिंदे आणि संतोष थोरात यांना दोषी धरले. त्यांना चार वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भोगावी लागेल.
सरकार पक्षाची बाजू सहा. सरकारी वकील अजय तांदळे यांनी मांडली. त्यांना पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागमवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिमान दादाराव भालेराव यांनी सहकार्य केले.