Breaking

सांगलीतील ४७ तोळ्यांच्या घरफोडी प्रकरणात आष्टीतून मुख्य आरोपी अटक; आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

Updated: ऑक्टोबर 15, 2025

By Vivek Sindhu

सांगलीतील ४७ तोळ्यांच्या घरफोडी प्रकरणात आष्टीतून मुख्य आरोपी अटक; आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी : सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यात भरदिवसा झालेल्या तीन घरफोड्यांमुळे खळबळ उडाली होती. तब्बल ४७ तोळे सोने चोरीला गेलेल्या या प्रकरणात सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कासारी येथून मुख्य आरोपीला अटक केली आहे.

शिराळा आणि इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या या तीन घरफोड्यांचा सूत्रधार संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले (वय २५, रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या मागावर सांगली पोलिसांनी १०० किलोमीटरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिलेच्या मदतीने आरोपींची ओळख पटली, तसेच दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी ठसे मिळवले.

या आधी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोहन भोसले या दुसऱ्या आरोपीने चौकशीत घरफोड्यांची कबुली दिल्याने सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ आष्टी तालुक्यात दाखल झाले. मंगळवारी (दि. १४ ऑक्टोबर) रात्री आष्टी पोलिसांच्या मदतीने कासारी येथील पारधीवस्तीवर छापा टाकण्यात आला. गोपनीय पद्धतीने केलेल्या या कारवाईत संतोष उर्फ नितेश भोसले याला अटक करण्यात आली.

या टोळीतील तिसरा साथीदार अतुल नवनाथ भोसले हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या तीन घरफोड्यांमध्ये तब्बल ४७ तोळे सोन्याचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या घटनांमुळे सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आष्टी पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली. फरार आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.


Categories

Recent Posts