Breaking
Updated: सप्टेंबर 8, 2025
सालगडी मुलाच्या खुनातील फरार आरोपीस एलसीबीने ठोकल्या बेड्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : शिरुर तालुक्यात मेंढ्या राखणाऱ्या सालगडी मुलाचा दगडाने डोक्यात प्रहार करून खून करून पसार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने थरारक कारवाईत जेरबंद केले. या कामगिरीमुळे परिसरात दिलासा पसरला आहे.
गोपाळ भिमराव शिंगाडे (रा. कासारी, ता. नांदगाव, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे पाटोदा येथे गुन्हा क्रमांक २७७/२०२५, कलम ३०२ भादंवि सहिता २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ सप्टेंबर रोजी दगडवाडी शिवारात सर्व मेंढ्या जाळीत बंद करून शेतात झोपलो असताना पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या सालगडी दिपक केरा भिलाल याच्यावर दुसऱ्या सालगडी विलास एकनाथ मोरे याने अज्ञात कारणावरून दगडाने डोक्यात प्रहार केला. त्यात दिपकचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पळून गेला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. तीन दिवस सतत वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर, आठ सप्टेंबर रोजी आनंदगाव शिवारातील डोंगरमाळ भागात गोपनीय माहितीवरून छापा टाकण्यात आला. तेथे आरोपी विलास एकनाथ मोरे (रा. निमगाव, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) हा फिरत असताना मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाटोदा पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पीएसआय श्रीराम खटावकर, पोह. अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, पो.कॉ. अश्पाक सय्यद, मनोज परजणे, अर्जुन यादव, अश्विन सुरवसे, सुनील राठोड व सिद्धेश्वर मांजरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.