Breaking
Updated: June 10, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupस्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
बीड : जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत प्रभावी आणि तांत्रिक तपासाद्वारे पॉवरग्रीड व साखर कारखान्यातील साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत शेपवाडी येथील पॉवरग्रीडमधून 12,95,000 किमतीचे अॅल्युमिनियम साहित्य आणि परळी येथील साखर कारखान्यातून 60,000 किमतीचे पितळ साहित्य चोरीस गेले होते. या दोन्ही गंभीर गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, हे गुन्हे शेख जावेद शेख हबीब व बंडू लक्ष्मण जोगदंड या दोन टोळ्यांनी केले आहेत.
ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्यासह विशेष पथक तयार करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी परळी येथे रवाना करण्यात आले.
पथकाने शिताफीने कारवाई करत शेख जावेद शेख हबीब (बरकत नगर, परळी), बंडू लक्ष्मण जोगदंड (रा.रुमना जवळा, ता. गंगाखेड, ह.मु. शिवाजीनगर, परळी), विजय नारायण जोगदंड (रा. भीमनगर, परळी), शेख अब्दुल रौफ इस्माईल (रा. जुना रेल्वे स्टेशन, परळी), प्रेम रावसाहेब वाघमारे (रा. नागसेननगर, परळी), संतोष सोपान कांबळे (रा. मिलिंदनगर, परळी) या चोरट्यांना बेड्या ठोकल्या. या सर्वांना पुढील तपासासाठी त्यांना अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या तपासातून अंबाजोगाई शहर आणि परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन वेगवेगळ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. सध्या चोरीस गेलेले अॅल्युमिनियम साहित्य कोठे विकले गेले किंवा कुठे आहे, याचा संयुक्त तपास अंबाजोगाई शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पो.ह. मारोती कांबळे, विकास राठोड, विष्णू सानप, नितीन वडमारे, सचिन आंधळे, विक्की सुरवसे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा बीड) यांनी केली.
या कारवाईमुळे औद्योगिक ठिकाणी होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसून कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.