केज – रस्त्याच्या मावेजासाठी औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेले प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हाती घेण्यात आलेले रस्त्याचे रुंदीकरण काम थांबविण्यात यावे, खंडपीठात खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी अभियंत्यावर गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्यांसाठी सुकळी (ता. केज) येथील तीन शेतकऱ्यांनी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर २२ जुलै पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यापैकी एका शेतकऱ्याची प्रकृती बिघडल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केज तालुक्यातील सुकळी ते गोटेगाव या २० फूट रस्त्याच्या मावेजाचे प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू असून हे प्रकरण निकाली निघण्यापूर्वी या रस्त्याच्या रुंदीकरण काम हाती घेण्यात आले असून हे काम थांबविण्यात यावे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांचा पंचनामा करण्यात यावा.
खंडपीठात खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी सा. बां. उपविभाग, केज अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. सुकळी येथे अद्याप काम चालू नसेल तर वृक्षतोड करणाऱ्या गुत्तेदार व कामगारांवर गुन्हा दाखल करावा यासाठी सुकळी येथील अमर गायकवाड, शाहू रघुनाथ गायकवाड, अजित विलास रांजणकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर २२ जुलै पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यापैकी शाहू गायकवाड यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या सुचनेवरून नायब तहसीलदार अशोक भंडारे, अव्वल कारकून गोकुळ नन्नवरे यांनी उपोषणास भेट देऊन उपअभियंता युवराज मळेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दोन कर्मचारी पाठवून देतो, असे सांगितले. मात्र कोणीही उपोषणाकडे फिरकले नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.