अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात ७ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडणाऱ्या ‘हरित बीड अभियान’ या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण उपक्रमासाठी जिल्हा पातळीवर जोरदार तयारी सुरू असून, अंबाजोगाईतील सर्वे क्रमांक १७ या ठिकाणी होणाऱ्या वृक्षारोपण जागेचा प्रत्यक्ष पाहणी दौरा आमदार नमिता मुंदडा यांनी केला. यावेळी त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, स्वच्छता निरिक्षक अनंत वेडे यांच्याशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.
या उपक्रमात एका दिवसात तब्बल ३० लाख वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून, हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणाऱ्या या मोहिमेसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, शासकीय व खासगी संस्था, सेवाभावी संघटना, शाळा व महाविद्यालये यांची सक्रिय भागीदारी असून, सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
हरितक्रांतीचा संकल्प घेऊन सुरु झालेल्या या अभियानामुळे परिसराचे पर्यावरणीय संतुलन सुधारण्यास मदत होणार आहे. आ. मुंदडा यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.