Breaking
Updated: मार्च 1, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: सामान्य जनता, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी राज्य शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ७ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीत ही शिबिरे अंबाजोगाई तालुक्यातील महसूल मंडळ स्तरावर घेतली जाणार असल्याची माहिती तहसीलदार विलास तरंगे यांनी दिली आहे. या अभियानांतर्गत ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांमधील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तसेच उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्रे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सेवांना प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा जवळच्या केंद्रावर मिळाव्यात आणि प्रशासकीय कामांना गती मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरांच्या माध्यमातून क्यूआर कोडयुक्त डिजिटल ७/१२ वितरण, ई-मोजणी, पीएम किसान सेवा आणि शेत रस्ते तसेच शिवरस्त्यांच्या तक्रारींचे निवारण तातडीने केले जाणार आहे. ‘एक खिडकी’ योजनेच्या माध्यमातून तत्काळ सेवा पुरवतानाच सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे मंजुरी आदेश, घरांसाठी पट्टे वाटप आणि पात्र लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास वाळूचे वितरण देखील करण्यात येईल. याशिवाय डिजिटल रेशनकार्ड वाटप, आधारकार्ड दुरुस्ती, निवडणूक ओळखपत्र नोंदणी, एसटी स्मार्ट कार्ड आणि जन्म-मृत्यू नोंदणी अशा विविध नागरी सेवांची उपलब्धता एकाच ठिकाणी करून देण्यात आली आहे. भूसंपादन व अकृषिक परवानग्यांच्या नोंदी अद्ययावत करून गाव दप्तर अद्यावतीकरण करण्यावरही या मोहिमेत भर दिला जाणार आहे.
या अभियानाचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले असून ७ मार्चला लोखंडी सावरगाव, १४ मार्चला घाटनांदूर, १० एप्रिलला राडी, ११ एप्रिलला उजणी, १७ एप्रिलला बर्दापूर, ८ मे रोजी पाटोदा म. आणि १५ मे रोजी अंबाजोगाई येथे ही शिबिरे संपन्न होतील. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी आश्विनी जिरंगे आणि उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विलास तरंगे व त्यांच्या संपूर्ण महसूल पथकाने या उपक्रमाचे नियोजन केले असून, सर्व लाभार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.