Breaking
Updated: फेब्रुवारी 11, 2026
प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नवनाथ घुगे यांना लंडनची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फेलोशिप बहाल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील ज्येष्ठ हृदयरोग व मधुमेहतज्ज्ञ डॉ. नवनाथ घुगे यांना त्यांच्या गेल्या २१ वर्षांच्या अविरत आणि समर्पित रुग्णसेवेबद्दल लंडन येथील ‘कॉमनवेल्थ मेडिकल असोसिएशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेची अत्यंत मानाची फेलोशिप प्रदान करण्यात आली. चेन्नई येथे आयोजित जागतिक वैद्यकीय परिषदेत संस्थेचे अध्यक्ष प्रो. डॉ. जे. ए. जयालाल यांच्या हस्ते त्यांना या गौरवाने सन्मानित करण्यात आले. जागतिक स्तरावरील ही प्रतिष्ठित फेलोशिप मिळवणारे डॉ. घुगे हे एकमेव हृदयरोगतज्ज्ञ ठरले असून, त्यांच्या या यशामुळे अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. नवनाथ घुगे यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महानगरातील मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचा मोह सोडून ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेचा ध्यास घेतला. त्यांनी आपल्या मातृभूमीत अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह पहिले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले, ज्यामुळे स्थानिक रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य झाले. त्यांनी आयसीयू, एमआरआय सेंटर अशा अद्ययावत सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून आजवर हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणले आहे. ५४ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या जागतिक संघटनेने डॉ. घुगे यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ही फेलोशिप बहाल केली आहे.
या यशात त्यांच्या पत्नी सौ. सारिका घुगे यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. डॉ. घुगे यांच्या या जागतिक गौरवाबद्दल राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासह वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.