Breaking

रेल्वे उद्घाटन सोहळा : नागरिकांनी खासगी वाहन कार्यक्रमस्थळी आणू नये; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Updated: सप्टेंबर 16, 2025

By Vivek Sindhu

रेल्वे उद्घाटन सोहळा : नागरिकांनी खासगी वाहन कार्यक्रमस्थळी आणू नये; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : बुधवार, दिनांक 17 सप्टेंबर रोजी बीड- अहील्यानगर रेल्वे उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम बीड शहरातील धानोरा रोडवरील रेल्वे स्टेशन येथे पार पडणार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून कार्यक्रमासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंग जागा व शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे खासगी वाहने तेथे अडकून नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तसेच रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने गर्दी वाढल्यास कार्यक्रमस्थळी पोहोचण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाने पर्यायी नियोजन केले आहे. बीड शहराबाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, जिल्हा परिषद कार्यालय व चंपावती क्रीडांगण येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून नागरिकांना मिनी बसेसद्वारे थेट कार्यक्रमस्थळी नेण्यात येईल.

बीड शहरातील नागरिकांसाठी बार्शी नाका, नगर नाका, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, माळीवेस, बलभीम चौक व बालेपीर या ठिकाणी पिकअप पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणांहूनही नागरिकांना थेट रेल्वे स्टेशनवर आणून परत सोडण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतलेली आहे.

त्यामुळे नागरिकांनी खासगी वाहन घेऊन कार्यक्रमस्थळी जाणे टाळावे, जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही व गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन बीड यांनी केले आहे.


Categories

Recent Posts