Breaking

मारहाण प्रकरणातून ‘खोक्या’ची निर्दोष मुक्तता

Updated: एप्रिल 2, 2026

By Vivek Sindhu

InShot 20260402 211717962

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

कारागृहातून बाहेर येताच रिल्सचा स्वॅग

बीड: येथील बहुचर्चित मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी सतीश ऊर्फ खोक्या भोसले याची बीड न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. गतवर्षी एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून त्याला अटक केली होती. या प्रकरणात दीर्घकाळ न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर काल न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आज त्याची छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहातून सुटका झाली आहे. कारागृहाबाहेर येताच समर्थकांनी त्याचे स्वागत केले असून, बीडकडे परतताना त्याने पुन्हा एकदा रिल्स बनवल्याने या घटनेची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत संवेदनशील राहिली आहे. जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर संतापाचे वातावरण असतानाच सतीश भोसलेचा मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. या घटनेमुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मार्च २०२५ मध्ये खोक्याला अटक केली होती. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याने या प्रकरणाला राजकीय रंगही प्राप्त झाला होता. संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आमदार धस यांच्यावरही विरोधकांनी त्यावेळी सडकून टीका केली होती.

सतीश भोसलेवर केवळ मारहाणीचाच नाही, तर वन्यजीव शिकार केल्याप्रकरणी देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगरच्या कारागृहात रवानगी झाल्यापासून तो न्यायालयीन लढाई लढत होता. अखेर बीड न्यायालयाने मारहाण प्रकरणातून त्याची मुक्तता केल्याने त्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कारागृहाबाहेर पडल्यानंतर मित्रांच्या गराड्यात बसून त्याने बनवलेले नवीन व्हिडिओ आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत.


Categories

Recent Posts