केज – केज तालुक्यातील देवगाव येथून रेणुकामाता देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम एप्रिल महिन्यात करण्यात आले आहे. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता उखडून गेला आहे. त्यामुळे संबधीत गुत्तेदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता थातुर – मातूर काम करून शासनाची व गावकऱ्यांची फसवणुक केली आहे. या रस्त्याचे काम आता ५ वर्षे केले जाणार नसल्याने क्वालिटी कंट्रोलमार्फत रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, काम करणाऱ्या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, या मागणीसाठी कैलास अर्जुन मुंडे यांच्यासह ग्रामस्थ गुरूवारी सकाळी ११ वाजेपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण बसले होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे, भाजपचे जेष्ठ नेते रमाकांत मुंडे, माजी ग्रा. पं. सदस्य महादेव गायकवाड यांनी उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या उपोषणाला पाठींबा दिला.
दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयाचे शाखा अभियंता शरद वीर, ए. एस. पटेल, संघरक्षित हातागळे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन १३ जून पर्यंत कामाची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी व गुत्तेदारावर उचित कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.