Breaking

रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचे गूढ उलगडले

Updated: June 7, 2025

By Vivek Sindhu

रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचे गूढ उलगडले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

मयत महिला माजलगावची; दहा दिवसांनंतर पोलिसांचा तपास यशस्वी

बीड : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे २५ मे रोजी एका २५ वर्षीय महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तपासात या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना १० दिवस लागले. अखेर या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला असून मृत महिला बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील वाघोरे गावची असल्याचं निष्पन्न झालं आहे.

या घटनेत मृत महिलेसह तिच्या १ व २ वर्षांच्या चिमुकल्यांची निर्दय हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला ही महिला या परिसरातील कोणालाही ओळखीची नव्हती. त्यामुळे तपास गुंतागुंतीचा ठरला. परंतु, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ६ विशेष तपास पथकांची नेमणूक करण्यात आली होती. राज्यातील ३३ पोलिस ठाण्यांचे सहकार्य, १६,५०० भाडेकरूंची चौकशी आणि २५० सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण यामुळे आरोपी गजाआड गेला.

तपासादरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून स्वाती केशव सोनवणे ही महिला आणि तिचे दोन मुलगे स्वराज (२) व विराज (१) बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले. तिचा पती केशव सोनवणे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने पत्नी वादावादीमुळे वेगळी राहत असल्याचं सांगितलं.

तपास अधिक खोलवर जात असताना समोर आलं की स्वातीचे तिच्या पतीसोबत वाद होते आणि तिचे गोरख बोखारे नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. सतत लग्नासाठी तगादा लावल्यामुळे गोरखने तिला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना फसवून रांजणगावला नेलं आणि स्वातीची तिच्याच ओढणीने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या दोन्ही मुलांनाही ठार केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी १० दिवसांच्या अथक तपासानंतर आरोपी गोरख बोखारेला अटक केली आहे.