Breaking

राज्यात हवामानाची गती मंदावली, काही ठिकाणी पावसाचा इशारा

Updated: June 5, 2025

By Vivek Sindhu

राज्यात हवामानाची गती मंदावली

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व हवामानाची गती मंदावली असून, राज्यात पावसाचा जोर १० ते १२ जूनदरम्यान कमी-अधिक प्रमाणात राहण्याची शक्यता असून सध्या मान्सूनच्या वाटेत अडथळा निर्माण झालेला आहे.

हवामान विभागाने केवळ हलक्या सरींचा अंदाज वर्तवला असतानाही मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी संध्याकाळपासूनच रिमझिम सरी सुरू होत्या, मात्र बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर प्रचंड वाढला. मुंबई, उपनगर आणि नवी मुंबईत जोरदार पावसामुळे सकाळीच काही भागांत पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.

दुसरीकडे, विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळसारख्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागांत आकाश ढगाळ राहण्याची चिन्हं आहेत.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागांत सध्या फारसा पाऊस नाही. काही ठिकाणी ऊन-पावसाचा लपंडाव दिसून येतो आहे. यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, मान्सूनची दाबरेषा अद्याप स्पष्टपणे तयार झालेली नसल्यामुळे ही स्थिती “मान्सून खंड” नाही, परंतु मान्सूनची गती निश्चितच मंदावली आहे. त्यांनी १२ ते १४ जूननंतर पावसात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही दिला आहे.

दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान असून, आर्द्रता ७० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान आहे. परिणामी उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे आणि नागरिकांना येत्या काही दिवसांतही अशाच वातावरणाचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.