Breaking
Updated: एप्रिल 7, 2026
२४.३८ कोटींच्या व्यवसायासह ३१ लाखांचा नफा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपला एकूण व्यवसाय २४.३८ कोटी रुपयांवर नेला आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेची आर्थिक स्थिती जाहीर करण्यात आली असून, या काळात संस्थेला ३१.११ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली आहे. माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या या संस्थेने आपल्या पारदर्शक कारभाराच्या जोरावर सहकार क्षेत्रात विश्वासाचे नाते घट्ट केले आहे.
संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक आकडेवारीनुसार, पतसंस्थेचे वसूल भागभांडवल १.८० कोटी रुपये असून संस्थेचा स्वनिधी ३.२० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सभासद आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास पाहता संस्थेकडे सध्या १६.६० कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. त्याचबरोबर संस्थेने गरजूंना ११.६८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून सुरक्षिततेचा विचार करून विविध क्षेत्रांत ८.५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एकूणच संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत असून संचित व्यवसाय आता २४.३८ कोटींच्या घरात गेला आहे.
या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव नारायण शेप आणि त्यांच्या सक्षम संचालक मंडळाला देण्यात येत आहे. संस्थेच्या संचालक मंडळात उपाध्यक्ष म्हणून कमलाकर ज्ञानोबाराव मलवाड हे जबाबदारी सांभाळत आहेत. इतर संचालक मंडळामध्ये भुजंगराव घनश्यामराव लाड, जनक गोविंदराव थोरात, वैजनाथ रामचंद्र शेप, दशरथ महादेव गवळे, बालप्रसाद भगवानदासजी रांदड, तुकाराम गोपाळराव कटारे आणि रमेश शंकरराव चाटे यांचा समावेश आहे. महिला प्रतिनिधी म्हणून सुनीता लक्ष्मणराव शिंदे आणि राजामती गुलाबराव वाघमारे या संचालक म्हणून कार्यरत आहेत. संस्थेच्या तांत्रिक आणि धोरणात्मक निर्णयांसाठी तज्ञ संचालक म्हणून शेख गफार शेख महंमद आणि शिवाजीराव मारुतीराव पठाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच, कार्यलक्षी संचालक, व्यवस्थापक तथा सचिव म्हणून रमेश पांडुरंग हाके हे संस्थेचा दैनंदिन प्रशासकीय गाडा हाकत आहेत.
संस्थेच्या या प्रगतीबद्दल अध्यक्ष, संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद यांनी सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतकांचे जाहीर आभार मानले आहेत. आगामी काळात ग्राहकांसाठी अधिक अद्ययावत सेवा पुरवण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे.